Groundwater Reserve | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाला असला तरी यंदा जिल्ह्यातील भूजल पातळी (Groundwater Reserve) गेल्या पाच वर्षाच्या तुलनेतील सरासरीपेक्षा १.६७ मीटरने अधिक घटली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या मे महिन्यात जिल्ह्याला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मार्च महिन्यामध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये तब्बल ७.८७ मीटरने भूजलपातळी घटली आहे.
हे वाचा – वीरगावच्या युवा शेतकऱ्याचे काकडी उत्पादनात दमदार यश
ओला दुष्काळ जाहीर (Groundwater Reserve)
जिल्ह्यात सरासरी ४४८.६ मिमी पावसाची नोंद होते. मात्र, गेल्यावर्षी सर्वच मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला होता. तब्बल ६६४ मिमी पावसाची झाला. मार्च महिन्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणात २०२ निरीक्षण विहिरींच्या अहवालानुसार जिल्ह्याची भूजल पातळी घटल्याचे म्हटले आहे. ऑक्टोबर २०२५ मधील सर्वेक्षणात भूजल पातळीत वाढ झाली होती. मात्र, मार्च महिन्यात त्यात मोठी घट झाली. ऑक्टोबर २०२५ मध्ये भूजलपातळी ०.९० मीटरने वाढली होती. वाढत्या पाण्याचा उपश्यामुळे तसेच दिवसेंदिवस सुर्य आग ओकत असल्याने भूजलपातळी झपाट्याने कमी होत आहे.
अवश्य वाचा- अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती
२०२ निरीक्षण विहिरी (Groundwater Reserve)
भूजल सर्वेक्षण विभागाच्या जिल्ह्यातील १४ तालुक्यातील २०२ निरीक्षण विहिरी आहेत. या विहिरीच्या माध्यमातून भूजल पातळीचे सर्वेक्षण केले जाते. ही भूजल पातळीची मागील पाच वर्षाच्या मार्च महिन्यामधील सरासरी तुलनात्मक स्थिती विचारात घेऊन यंदाच्या मार्च २०२६ ची भूजल पातळी निश्चित करण्यात येते. त्याआधारे भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. मार्च महिन्यात पातळी खालावल्याने एप्रिल महिन्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. त्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तलाव, विहिरींच्या पाणी पातळीत घट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाई आता अधिक भासू लागली आहे. येत्या काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे महिन्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक भासू शकते.
ऑक्टोबरमध्ये भूजल पातळीत वाढ (Groundwater Reserve)
ऑक्टोबर २०२५ मधील सर्वेक्षणानुसार भूजल पातळीमध्ये वाढ झाली होती. तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (आकडे मीटरमध्ये) अकोले ०.४४, जामखेड १.३०, कर्जत ०.२४, कोपरगाव १.११, नगर १.०३, नेवासा ०.५८, पारनेर ०.८२, पाथर्डी ३.०८, राहाता ०.३५, राहुरी ०.७९, संगमनेर १.०४, शेवगाव १.६४, श्रीगोंदा ०.९०, श्रीरामपूर ०.९०.
हे पहा – आदिनाथ महाराज शास्त्रींनी स्वतःवरच वार का केले? कारण आलं समोर…
सहा तालुक्यांतील घट अधिक (Groundwater Reserve)
ऑक्टोबर २०२५ नंतर सहाच महिन्याने मार्च २०२६ मधील सर्वेक्षणात भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. (आकडे मीटरमध्ये) अकोले १.३८, जामखेड २.००, कर्जत १.४०, कोपरगाव १.७६, नगर १.८५, नेवासा १.८०, पारनेर १.८७, पाथर्डी १.०५, राहाता १.८४, राहूरी १.५९, संगमनेर १.८२, शेवगाव १.८२, श्रीगोंदा १.६०, श्रीरामपूर १.६५. जामखेड, अहिल्यानगर, पारनेर, राहाता, संगमनेर व शेवगाव या सहा तालुक्यांत भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. तर मार्चमधील सर्वेक्षणात सर्वाधिक कोपरगाव तालुक्यात ९.४३ मीटरने भूजल पातळी घटली. सरासरी १.७६ मीटरची घट आहे.



