Nagar-Pune Railway: नगर: अहिल्यानगर- पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या दैनंदिन समस्यांना कायमस्वरूपी तोडगा मिळावा आणि या मार्गावर स्वतंत्र इंटरसिटी रेल्वे सेवा (Nagar-Pune Railway) सुरू व्हावी, या प्रमुख उद्देशाने अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटना यांच्या वतीने ‘मिशन 25,000 प्रवासी अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी जनआंदोलन’ या व्यापक लोकचळवळीचा (People’s movement) प्रारंभ करण्यात आला आहे. हे आंदोलन पूर्णपणे नागरिकांच्या सहभागातून, पक्षनिरपेक्ष आणि लोकहिताच्या भावनेतून उभारण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
अहिल्यानगर आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान दररोज हजारो विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक, औद्योगिक कर्मचारी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध आजारांवर उपचारासाठी जाणारे रुग्ण प्रवास करतात. मात्र वाढती वाहतूक कोंडी, वेळेचा होणारा मोठा अपव्यय, वाढलेला इंधन व प्रवास खर्च, खासगी वाहनांवरील अवलंबित्व आणि सार्वजनिक वाहतुकीतील अपुऱ्या सुविधा यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नक्की वाचा : राहुरी–शनिशिंगणापूर प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करावा; आमदार कर्डिले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अनेक वर्षांपासून अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी ट्रेनची मागणी
अनेक वर्षांपासून अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी ट्रेनची मागणी सातत्याने होत असली, तरी अद्याप या मागणीची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे आता नागरिकांच्या थेट सहभागातून शासन आणि भारतीय रेल्वेचे लक्ष वेधण्यासाठी ‘मिशन 25,000 प्रवासी’ ही जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अभियानात जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतील संस्था व संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. औद्योगिक संघटना, एमआयडीसीतील उद्योग समूह, चेंबर ऑफ कॉमर्स, व्यापारी संघटना, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठे, रुग्णालये, वैद्यकीय संघटना, डॉक्टर व वकील संघटना, स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब, युवक व महिला संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, शेतकरी संघटना, प्रवासी संघटना, गृहनिर्माण संस्था तसेच प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
‘माझा प्रवास… माझा संघर्ष’ अभियानाला 5 जुलैपासून प्रारंभ (Nagar-Pune Railway)
या जनआंदोलनाचा पुढील महत्त्वाचा टप्पा ‘माझा प्रवास… माझा संघर्ष’ या डिजिटल मोहिमेच्या स्वरूपात राबविण्यात येणार आहे. 5 जुलै 2026 पासून अहिल्यानगरपुणे मार्गावरील प्रत्येक नियमित प्रवाशाने केवळ 30 सेकंदांचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या व्हिडिओमध्ये प्रवाशांनी आपण अहिल्यानगरपुणे प्रवास का करतो, दररोज किती वेळ वाया जातो, महिन्याला प्रवासावर किती खर्च होतो आणि इंटरसिटी ट्रेन सुरू झाल्यास आपल्या आयुष्यात काय सकारात्मक बदल होईल, याविषयी आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. हे व्हिडिओ Facebook, Instagram, X आणि YouTube या सोशल मीडिया माध्यमांवर #Mission25000, #NagarPuneIntercity, #MyJourneyMyStruggle, #TrainForPeople आणि #AhilyanagarToPune या हॅशटॅगसह शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अवश्य वाचा: कर्जतमध्ये पुन्हा वाहतूक कोंडी; विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे
किमान पाच हजार प्रवाशांचे व्हिडिओ एकत्र करणार
या अभियानातून किमान पाच हजार प्रवाशांचे व्हिडिओ एकत्र करून शासन आणि भारतीय रेल्वेसमोर या मार्गावरील प्रवाशांची एकसंघ, ठोस आणि प्रभावी भूमिका मांडण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “ही केवळ एका रेल्वेगाडीची मागणी नसून वेळेची बचत, सुरक्षित प्रवास, विद्यार्थ्यांचे शिक्षण, रोजगाराच्या संधी, उद्योग-व्यवसायाची वाढ आणि अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासासाठी उभारलेले व्यापक लोकआंदोलन आहे. या आंदोलनाला प्रत्येक नागरिकाचा सहभाग लाभणे आवश्यक आहे.”
या अभियानासाठी अर्शद शेख, संदेश रापारिया, विपुल शाह, सुनील छाजेड, अजय दिघे, संतोष बडे, सुनील थोरात, संजय चव्हाण, संजय वाळुंज आदींसह अनेक मान्यवरांनी पुढाकार घेतला असून, जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था, औद्योगिक संघटना, व्यापारी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दैनिक प्रवाशांनी या लोकचळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या जनआदोलनाच्या अधिक माहितीसाठी हरजीतसिंह वधवा (9423162727), प्रशांत मुनोत (9422229699), संजय सपकाळ (9890228964) आणि अशोक कानडे (9822093636) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “चला… 25 हजार प्रवाशांचा आवाज एकत्र करूया आणि अहिल्यानगरपुणे इंटरसिटी ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात आणूया,” असा निर्धार व्यक्त करत या जनआंदोलनाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.



