
Rohit Pawar Vs Vikram Pachpute : नगर : राज्याच्या राजकारणात विरोधकांना आक्रमकपणे घेरणाऱ्या युवा नेत्यांमध्ये आमदार रोहित पवार यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. MPSC परीक्षेतील कथित पेपरफुटीपासून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांपर्यंत पवार सातत्याने सरकारला लक्ष्य करत आहेत. आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींचा मुद्दा त्यांनी चांगलाच तापवला आहे. मात्र, रोहित पवारांच्या या आक्रमक राजकारणाला आता भाजपकडून त्यांच्याच वयाच्या, त्यांच्याच जिल्ह्यातील एका युवा आमदाराने थेट प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. श्रीगोंदा-नगरचे आमदार विक्रम पाचपुते यांनी सोशल मीडियावर तसेच माध्यमांवर MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून रोहित पवारांना सुनावले. त्यामुळे हा केवळ सोशल मीडियावरील पलटवार आहे की, त्यामागे भाजपची मोठी राजकीय खेळी आहे, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
पाचपुते अचानक ‘पवारविरोधी चेहरा’ का?
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रोहित पवार आणि विक्रम पाचपुते हे अहिल्यानगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात. आजवर दोघांमध्ये असा थेट राजकीय सामना फारसा दिसला नाही. मग अचानक पाचपुतेंनी पवारांना लक्ष्य का केले? विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतेच श्रीगोंदा येथे विक्रम पाचपुतेंनी राज्यात सक्रिय व्हावे, अशा आशयाचे आवाहन केले होते. त्यानंतर पाचपुते थेट राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नावरून रोहित पवारांना लक्ष्य करताना दिसले. प्रदेशाध्यक्षांकडून राज्यात सक्रिय होण्याचे आवाहन आणि त्यानंतर पवारांना थेट लक्ष्य करण्याची सुरुवात या दोन घटनांची सांगड राजकीय चर्चेत घातली जात आहे.
‘रोहित पवार विरुद्ध विक्रम पाचपुते’ हा नवा सामना? (Rohit Pawar Vs Vikram Pachpute)
पाचपुतेंना श्रीगोंदा-नगरच्या राजकारणातून बाहेर काढून राज्याच्या राजकारणात ‘भाजपचा युवा आक्रमक चेहरा’ म्हणून प्रोजेक्ट करण्याची तयारी तर सुरू नाही ना? हा प्रश्न त्यामुळेच महत्त्वाचा ठरतो. विक्रम पाचपुते यांची राजकीय पार्श्वभूमीही दुर्लक्ष करण्यासारखी नाही. पहिल्याच टर्ममध्ये आमदार झाल्यानंतर अधिवेशनात त्यांनी मांडलेले लक्ष्यवेधी प्रश्न आणि अभ्यासपूर्ण भूमिका यामुळे त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे भाजपसमोर राज्यात युवा नेतृत्वाची नवी फळी उभी करण्याचा प्रश्न असेल, तर पाचपुते हा पक्षासाठी उपयोगी चेहरा ठरू शकतो. अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत विखे, थोरात, जगताप, शिंदे, लंके यांसारख्या नावांभोवती राजकीय समीकरणे फिरत आली आहेत. मात्र आता युवा नेतृत्वाची एक नवी रेषा तयार होताना दिसत आहे. जर पाचपुतेंनी पवारांच्या प्रत्येक राज्यव्यापी मुद्द्याला थेट प्रत्युत्तर देण्याची भूमिका कायम ठेवली, तर ही लढत केवळ दोन आमदारांमधील वाकयुद्ध राहणार नाही. त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘युवा विरुद्ध युवा’ अशी नवी राजकीय आखणी होऊ शकते.
पण पाचपुतेंसमोरही मोठे आव्हान! (Rohit Pawar Vs Vikram Pachpute)
पाचपुते राज्यात सक्रिय होणार असतील, तर त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विशेषतः डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याचा मुद्दा आता अहिल्यानगर-पुणे संघर्षाचे केंद्र बनण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाला पुणे जिल्ह्यातील नेते आणि शेतकऱ्यांकडून विरोधाची भूमिका घेतली जात आहे. अशावेळी पुण्यातील विरोधकांना सामोरे जाण्यासाठी पाचपुतेंची भूमिका काय असेल? हा त्यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा घेणारा मुद्दा ठरू शकतो. राज्याच्या प्रश्नांवर रोहित पवारांना सुनावणे सोपे आहे; पण स्वतःच्या मतदारसंघाच्या हितासाठी पुण्यातील राजकीय दबावाला सामोरे जाणे हे त्याहून मोठे आव्हान आहे.
नक्की पहा : सुजय विखेंचं नाव पुढंच…,पण संधी का हुकते? ‘नगर-मनमाड’चा स्पीड ब्रेकर? की आणखी काही?
पवारांनाही आत्मपरीक्षणाची गरज? (Rohit Pawar Vs Vikram Pachpute)
या समीकरणात रोहित पवारांनाही एक प्रश्न विचारला जात आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे निश्चितच महत्त्वाचे आहे. पण त्याचवेळी मतदारसंघातील विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि जनतेच्या अपेक्षा याकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे. कारण भाजपने पाचपुतेंना राज्याच्या मैदानात उतरवले, तर पवारांवर ‘राज्याच्या राजकारणात सक्रिय, पण मतदारसंघाकडे किती लक्ष?’ असा राजकीय सवाल उपस्थित करण्याची संधी सत्ताधाऱ्यांना मिळू शकते.
भाजपची रणनीती की पाचपुतेंची स्वतःची भूमिका? (Rohit Pawar Vs Vikram Pachpute)
रोहित पवार राज्यातील मुद्दे घेऊन सरकारवर गोळीबार करत आहेत आणि त्या गोळीबाराला उत्तर देण्यासाठी भाजपने पाचपुतेंच्या रूपाने नवा ‘शूटर’ मैदानात उतरवला आहे का? अर्थात, भाजपने अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पाचपुतेंची भूमिका ही त्यांची स्वतःची राजकीय भूमिका असू शकते. आगामी काळात पाचपुते केवळ रोहित पवारांच्या टीकेला उत्तर देणार की राज्यातील इतर विरोधी नेत्यांविरोधातही आक्रमक भूमिका घेणार, यावर या चर्चेचे उत्तर मिळेल. भाजपने खरोखरच पाचपुतेंना राज्याच्या राजकारणात ‘पवारांना रोखणारा युवा चेहरा’ म्हणून पुढे करण्याची रणनीती आखली असेल, तर ही खेळी कितपत यशस्वी होते, हे पाहणे आता अहिल्यानगरपेक्षा महाराष्ट्रासाठी अधिक औत्सुक्याचे ठरणार आहे.


