Shankar Maharaj: पाथर्डी: शहरातून सद्गुरू श्री शंकर महाराज (Shankar Maharaj) यांच्या ७९ व्या समाधी दिनानिमित्त येथील मठामध्ये पारंपरिक पद्धतीने भव्य व भक्तीमय वातावरणात सोहळा उत्साहात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा आध्यात्मिक सोहळा रंगला. सद्गुरु श्री शंकर महाराज भक्ती मठामध्ये पहाटे महाराजांच्या मूर्ती व पादुकांवर रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर नित्यपाठ, सामूहिक वाचन व आरती झाली. सकाळी खोलेश्वर मंदिरातून वाजत-गाजत भव्य पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. जय भवानी चौक, गांधी चौक मार्गे नवी पेठेतून नगरप्रदक्षिणा करत पालखी पुन्हा मठात दाखल झाली. मार्गावर भाविकांनी पुष्पवृष्टी करून पालखीचे पूजन केले.
अवश्य वाचा- मोकाट जनावरांच्या धडकेत बालिका जखमी; पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ
मन शुद्ध असेल तरच गुरूंचे खरे दर्शन घडते (Shankar Maharaj)
शनेश्वर सेवा मंडळ व क्रांती चौक मित्र मंडळ यांच्या वतीने पिण्याचे पाणी व सरबतचे वाटप करण्यात आले.दुपारी महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. नाशिक येथील उपअभियंता प्रल्हाद सोनवणे यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला, तर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी विजय दरगोडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी भक्तांना मार्गदर्शन करताना शंकर महाराज भक्ती मठाचे संस्थापक माधव बाबा म्हणाले, संकटांच्या वेळी ईश्वरावर दृढ श्रद्धा ठेवून निष्ठेने सेवा करणे आवश्यक आहे. मन शुद्ध असेल तरच गुरूंचे खरे दर्शन घडते. सेवेत सातत्य आणि भावनेत निःस्वार्थपणा असेल, तर कृपा आपोआप लाभते. प्रत्येकाने आपल्या आचरणातूनच अध्यात्म जपले पाहिजे. दुसऱ्यांच्या कल्याणातच आपले खरे समाधान दडलेले आहे. श्रद्धा, सेवा आणि सद्बुद्धी यांचा मार्ग स्वीकारला, तर जीवन नक्कीच प्रकाशमान होते.सुरत, पुणे, नाशिक, मुंबई, वर्धा, अमरावती, बीड, कल्याण, ठाणे, सोलापूर आदी ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



