
Shrigonda : नगर : श्रीगोंदा शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरामध्ये वाढत्या टवाळखोरांच्या त्रासाम ळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, या रोड रोमिओंवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने श्रीगोंदा पोलीस स्टेशनकडे करण्यात आली आहे.
हेही वाचा : पद्मसिंह पाटलांची निर्दोष मुक्तता; खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले…
टवाळखोरांकडून वारंवार त्रास
श्रीगोंदा शहरात महाराजा कॉलेज आणि छत्रपती कॉलेज ही दोन प्रमुख महाविद्यालये असून, कॉलेज परिसरापासून एसटी स्टँडपर्यंत सुमारे दोन किलोमीटर अंतर आहे. या मार्गावर पायी ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना टवाळखोरांकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. गाड्यांवरून कट मारणे, मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे, सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करणे तसेच अश्लील टिप्पणी करून मुलींना त्रास देण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. तसेच विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय परिसरात शाळा भरताना आणि सुटताना टवाळखोरांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलींना अमिष दाखवून फसवण्याचे प्रकारही वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
नक्की पहा : शेतकरी विधवांना केवळ १ रुपयात मिळणार सरकारी जमीन
पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवा (Shrigonda)
या पार्श्वभूमीवर मुलींच्या शाळांमध्ये जाऊन समुपदेशन कार्यक्रम आयोजित करावा तसेच शाळा व महाविद्यालयाच्या वेळेत परिसरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे आणि जिल्हा कार्याध्यक्ष गणेश पारे यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शाळा व महाविद्यालय परिसरात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


