SIR : नगर : भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनावर आधारित मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास सर्व राजकीय पक्ष तसेच मतदारांनी आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.
या कार्यक्रमानुसार ३० जून २०२६ ते २९ जूलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन प्रगणना फॉर्म वाटप करणार आहेत. हे फॉर्म प्रत्येक मतदाराला दोन प्रतीत दिले जातील. मतदारांनी दोन्ही फॉर्म पूर्णपणे भरून अधिकाऱ्याकडे जमा करावेत व एका प्रतीवर पोहोच घेणे आवश्यक आहे. प्रगणना फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून देण्याचीही सुविधा उपलब्ध असणार आहे. मतदारांचे सन २००२ च्या मतदारयादीशी मॅपिंग झाले असले तरीही सर्वांनी फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. फॉर्म भरून न दिलेल्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट होणार नाहीत.
हेही वाचा : वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा : जिल्हाधिकारी
हरकती नोंदविता येणार
ज्या मतदारांचे प्रगणना फॉर्म प्राप्त होतील त्यांची प्रारूप मतदार यादी ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ५ ऑगस्ट २०२६ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत यादीबाबत काही हरकती व दावे असल्यास नियमानुसार दाखल करता येतील. तसेच ५ ऑगस्ट २०२६ ते ३ ऑक्टोबर २०२६ या दरम्यान प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट असणारे परंतु २००२ च्या यादीशी मॅपिंग न झालेले किंवा अचूक मॅपिंग न झालेले मतदार यांची मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून सुनावणी घेतली जाईल. सुनावणीवेळी मतदारांनी आपला रहिवास व जन्माचा पुरावा दाखल केल्यावर त्यांची नावे अंतिम यादीत समाविष्ट होतील.
नक्की पहा : प्रत्येक डिस्चार्ज म्हणजे संसर्ग असतो?
अंतिम यादी प्रसिद्ध होणार (SIR)
प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेले हरकती व दावे निर्गत करून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने १४ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित प्रतिनिधींना कार्यक्रमाची सविस्तर माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक यादी भागाकरिता एक मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले असून नियुक्त प्रतिनिधींना मतदार नोंदणी अधिकारी स्तरावर प्रशिक्षण दिले जाईल.



