
District Collector : नगर : पांडुरंगाच्या (Pandurang) दर्शनासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील अनेक दिंड्या आषाढी वारीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान करतात. या दिंड्यांतील वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, मुक्कामाची व्यवस्था, फिरती स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा तसेच सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी दिले.
नक्की वाचा : अपहरण करुन लूटमार करणारे चार आरोपी १२ तासांत जेरंबद; कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई
सुविधांची व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आषाढी वारी – २०२६ नियोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.”आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. हजारो वारकरी पायी प्रवास करत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसह सर्व मूलभूत सुविधांची प्रभावी व्यवस्था करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. ज्या गावांमध्ये अथवा शहरांमध्ये दिंड्यांचा मुक्काम होणार आहे, त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,” असे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप उभारणार (District Collector)
दिंडी मार्गावर वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, निवास व्यवस्था आणि वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने समन्वयाने कार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात यावेत. आवश्यकतेनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमधील खोल्याही उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
दक्षता घेण्याचे निर्देश
वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी तसेच महत्त्वाच्या ठिकाणी आरोग्य पथके तैनात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ आणि रुग्णवाहिका उपलब्ध ठेवून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच दिंडीदरम्यान पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता नियमित तपासण्याबरोबरच मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक इंधन व्यवस्थाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
समन्वयासाठी व्हॉट्सॲप समूह तयार करावा
शासनाने इंधनाचा कमीत कमी वापर करण्याबाबत निर्देश दिले असून, सर्व विभागांनी त्याचे काटेकोर पालन करून इंधन बचतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले.आषाढी वारीदरम्यान प्रभावी समन्वय राखण्यासाठी सर्व विभागांच्या नोडल अधिकाऱ्यांची संपर्क सूची तयार करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक नमूद करून तातडीच्या समन्वयासाठी व्हॉट्सॲप समूह तयार करावा. तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावर हेल्पलाईन क्रमांक सुरू करून त्याची माहिती प्रत्येक दिंडीपर्यंत पोहोचवावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना
वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी दिंडी मार्गावरील वाहतुकीचे प्रभावी नियमन करण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. मुक्कामाच्या ठिकाणीही पोलीस कर्मचारी नियुक्त करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यावर भर देण्यात आला. तसेच दिंडी मार्गावरील रस्त्यांची डागडुजी, खड्डे भरणे आणि आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या.
प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त
यावेळी संत निळोबाराय पालखीचे अध्यक्ष अशोकराव सावंत तसेच विविध दिंडी प्रमुखांनी गतवर्षी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. फिरती स्वच्छतागृहे, इंधन व्यवस्था, आरोग्य सेवा, मंडप व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, टँकरद्वारे पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि रेनकोट यांसह विविध सुविधांबाबत मागण्या आणि सूचना यावेळी मांडण्यात आल्या. बैठकीत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे दिली.
पालखी प्रमुख आणि दिंडी प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, संत निळोबाराय पालखीचे अध्यक्ष अशोकराव सावंत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, देवीदास महाराज म्हस्के, मानाच्या पालख्यांचे प्रमुख, विविध दिंडी प्रमुख तसेच संबंधित विभागांचे अधिकारी पालखी प्रमुख आणि दिंडी प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.


