Tamasha Artist | पारनेर : संगमनेर (Sangamner) तालुक्यात तमाशा कलावंतांवर (Tamasha Artist) मागील महिन्यात जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेवर राज्यभर टीका झाली होती. आता पुन्हा तमाशा कलावंतांवर अहिल्यानगर जिल्ह्यातच हल्ला झाला आहे. पारनेर (Parner) तालुक्यातील वडगाव सावताळ व श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात असे प्रकार यात्रोत्सवात घडले. त्यामुळे तमाशा कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यात निर्माण झाला आहे.
तळीरामांकडून कलावंतांना मारहाण (Tamasha Artist)
वडगाव सावताळ (ता.पारनेर) येथे बनाईदेवी यात्रोत्सवानिमित्त आयोजित तमाशा कार्यक्रमादरम्यान तळीरामांकडून कलावंतांवर मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात प्रमुख तिघांसह ४ ते ५ अनोळखी जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपाली भोसले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र भाऊसाहेब शिंदे, अमोल नामदेव शिंदे, बाळू छबन बर्डे (रा. वडगाव सावताळ, ता. पारनेर) यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अवश्य वाचा – रुपाली चाकणकरांच्या बहिणीने सर्व आरोप फेटाळले; ‘ती’ खाती बनावट असल्याचे स्पष्टीकरण
पोलीस येताच हल्लेखोरांनी काढला पळ (Tamasha Artist)
फिर्यादीत म्हटले आहे की, यात्रा कमिटीच्या निमंत्रणावरून १२ एप्रिल रोजी तमाशा पथक वडगाव सावताळ येथे दाखल झाले होते. रात्री सुमारे दहा वाजता एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत स्टेजजवळ येऊन कार्यक्रम कधी सुरू होणार याची विचारणा केली. काही वेळातच तो ७ ते ८ जणांसह परत येत कार्यक्रम बंद करण्याची मागणी करत शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की करू लागला. वाद वाढताच संबंधितांनी कलाकारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या गणेश अष्टीकर भोसले यांना खुट्याने मारहाण करण्यात आली, तर महिला कलाकारांचे कपडे फाडले तसेच तमाशातील ऑरगन, ढोलकी, कच्ची ढोल, माईक, मिक्सर, लाईट व साऊंड बॉक्सची तोडफोड करून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच गावकरी व पोलिस घटनास्थळी दाखल होताच हल्लेखोरांनी पळ काढला. या प्रकारामुळे तमाशा कलावंतांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अखेर कार्यक्रम रद्द करण्यात आला.
दरम्यान, या गंभीर घटनेची सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
हे पहा – आगडगावमध्ये भरते भुतांची जत्रा
श्रीगोंद्या तालुक्यातील एका गावातील यात्रेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या प्रसिद्ध तमाशा कलावंत मालती इनामदार यांचा फड सादर होत असताना काही तरुणांनी गोंधळ घातला. तमाशा सुरू होताच शिट्ट्या मारणे, अश्लिल हावभाव करणे, खडे मारण्यासारखे गैरप्रकार केले. त्यामुळे तमाशा वारंवार बंद पडला, कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मालती इनामदार पुढे आल्या. त्यांनी आर्त शब्दात विनंती केल्यावर प्रेक्षक शांत झाले आणि त्यांनी कार्यक्रम होऊ दिला.



