
Uber Driver Robbed : नगर : झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी युट्यूबवर चोरीच्या क्लृप्त्या पाहून उबेर चालकाला लुटणाऱ्या (Uber Driver Robbed) तीन जणांच्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) अटक केली आहे. आरोपींकडून लुटलेली कार तसेच गुन्ह्यात वापरलेले साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. विशाल सोमनाथ तांगडे (वय १९), तुळशीराम पंढरीनाथ चव्हाण (वय २१) आणि कल्याण उर्फ बबलू रामेश्वर गायकवाड (वय १९, सर्व रा. आनंदवाडी, ता. गेवराई, जि. बीड), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची (Accused taken into custody) नावे आहेत.
डोक्याला बंदूक लावून हात बांधले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोल्हेवाडी (सिंहगड रोड) येथील उबेर चालक विशाल सूर्यकांत कट्टीमणी यांच्याकडे १३ जून रोजी उबेर अॅपद्वारे वाकडेवाडी एसटी स्टँड (पुणे) ते माळेवाडी (ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे भाडे बुक करण्यात आले होते. १४ जून रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास खोसपुरी शिवारातील एका हॉटेलजवळ लघुशंकेसाठी वाहन थांबविण्यास सांगितले. त्यावेळी गाडीतील तिघांनी चालकाच्या डोक्याला बंदूक लावून त्याचे हात बांधले, मारहाण केली आणि रोख रक्कम, सोन्याची अंगठी तसेच कार असा सुमारे ५ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला.
नक्की वाचा : साईबाबांची शपथ घेत दुसऱ्यांदा गद्दारी; शिर्डीचे शिवसैनिक वाकचौरेंवर भडकले
विशेष तपास पथक तयार (Uber Driver Robbed)
याप्रकरणी १५ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी विशेष तपास पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विशाल सोमनाथ तांगडे (वय १९), तुळशीराम उर्फ राम पंढरीनाथ चव्हाण (वय २१) आणि कल्याण उर्फ बबलू रामेश्वर गायकवाड (वय १९, सर्व रा. आनंदवाडी, ता. गेवराई, जि. बीड) यांचा शोध घेतला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सापळा रचून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न
आनंदवाडी येथे सापळा रचून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी युट्यूबवरील व्हिडिओंच्या आधारे गुन्ह्याची योजना आखल्याची कबुली दिली. उबेर अॅपवरून बनावट ओळख वापरून वाहन बुक करणे, सिमकार्डचा वापर करून माग काढणे कठीण करणे आणि वाहनाचा जीपीएस काढून टाकणे अशा पद्धतीने त्यांनी हा गुन्हा केल्याचे उघड झाले.ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, सफौजदार राकेश खेडकर, पोलीस अंमलदार शैलेश रोहोकले, दीपक फुंदे, नवनाथ दहिफळे, किशोर जाधव, राहुल गुंडू आणि अरुण सांगळे यांच्या पथकाने केली आहे.


