
UPSC Success : नगर : ‘अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज’ या शिक्षण संस्थेच्या रेसिडेन्सिअल हायस्कूलचे माजी विद्यार्थी महेश ईश्वर जंजिरे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय पोलिस दलात असिस्टंट कमांडंट या पदावर थेट निवड झाली. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे व सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील यांच्या हस्ते जंजिरे यांचा एका खास समारंभात विशेष गौरव करण्यात आला.
नक्की वाचा : पाथर्डी बाजारपेठेच्या समस्यांवर व्यापारी आक्रमक; मूलभूत सुविधा द्या, अन्यथा ‘पाथर्डी बंद’चा इशारा
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
महेश जंजिरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत विशेष मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘’राज्य व देश पातळीवरील स्पर्धा परीक्षेत मराठी मुलांचा टक्का पूर्वी फारच कमी होता. आता तो वाढत असला तरी अपेक्षेएवढा नाही. अनेक विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या भौतिक सुविधा व मजबूत आर्थिक परिस्थिती याशिवाय स्पर्धा परीक्षेत यश मिळूच शकत नाही, असा न्यूनगंड आहे. परंतु ते साफ चुकीचे असून, जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करणा-यांना स्पर्धा परिक्षेतील यशापासून कोणीही रोखू शकत नाही.’’
हेही पहा : झेंडीगेट परिसरात पोलिसांचे मॉकड्रील
यांची उपस्थिती (UPSC Success)
यावेळी संस्थेच्या खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, सहसचिव मुकेश मुळे, कार्यकारिणी सदस्या अरुणा काळे, ‘रेसिडेन्शियल’चे प्राचार्य धनंजय म्हस्के, उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर, संस्थेच्या शिवाजी सहकारी भांडारचे अध्यक्ष प्रा. रवींद्र देवढे, शिक्षक नेते प्रा. डॅा. सुधाकर सुंबे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, पालक, कर्मचारी, विद्यार्थी व जंजिरे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. दरे व आठरे पाटील यांनी जंजिरे यांच्या ‘युपीएससी’तील अभूतपूर्व यशाचे कौतुक केले. ‘रेसिडेन्शियअल’चे प्राचार्य धनंजय म्हस्के यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू विशद केला. उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर, प्रा. रवींद्र देवढे, प्रा. सुधाकर सुंबे आदींनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.


