
Electricity Bills : राहाता : शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या जुन्या थकबाकीच्या वीज बिलावरील (Electricity Bills) व्याज माफ करुन उर्वरित रक्कमेला 50 टक्के सवलत दयावी अशी मागणी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा (Dr. Rajendra Pipada) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची शिर्डी विमानतळावर त्यांची भेट घेऊन केली. यावेळी आरपीयाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाघमारे हे ही उपस्थित होते.
नक्की वाचा : संगमनेर येथे बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न
शेतकऱ्यांचे व्यवहार रखडतात
निवेदनात म्हटले आहे की, सध्या शासनाने शेतक-यांना शेतीतील शेतीपंपा साठी लागणारी वीज मोफत केली आहे परंतु, एका शेतकऱ्याने आपली जमीन दुसऱ्या शेतकऱ्याला विक्री करावयाची असल्यास, शेतीपंपावरील जुनी वीज बिलाची थकबाकी असल्यामुळे वीज कनेक्शन हस्तांतरण करण्यास अडथळा येतो. तसेच भावाभावांमध्ये शेत जमीनीचे वाटप करावयाचे असले तरी थकीत वीजबिलांमुळे प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे व्यवहार रखडतात व आर्थिक अडचणी अधिक तीव्र होतात. या पार्श्वभूमीवर, जुन्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज माफ करून मूळ थकबाकीमध्ये किमान ५० टक्के सवलत देण्यात आल्यास, शेतकरी स्वखुशीने उर्वरित रकम भरण्यास पुढे येतील. यामुळे प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि शासनाच्या महसुलातही लक्षणीय वाढ होईल.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच कठीण
राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटातून जात असून शेतीमालाचे अस्थिर दर, वाढता उत्पादन खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांची परिस्थिती अधिकच कठीण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या थकीत इलेक्ट्रीक शेतीपंप वीजबिलावरील व्याज माफी तसेच पूर्वीप्रमाणे ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अनेक शेतकऱ्यांकडून वीजबिलाची थकबाकी वाढलेली असली तरी, जर प्रलंबित वीजबिलावरील व्याज माफ करण्यात आले, तर शेतकरी मूळ थकबाकी भरण्यास तयार आहेत. यामुळे शासनालाही महसूल मिळेल आणि शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळेल.
संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना द्याव्यात
यापूर्वी शासनाने राबविलेल्या वीजबिल माफी योजनेत ५० टक्के सवलत व संपूर्ण व्याज माफी देण्यात आली होती. त्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसून आला होता. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा असा निर्णय घेतल्यास मोठ्या प्रमाणावर शेतकरी थकबाकी भरण्यास पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या संदर्भात शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना द्याव्यात, या आशयाचे निवेदन भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डी विमानतळावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिले.


