The Thiya Movement: पारनेर: तालुक्यातील पळशी, वनकुटे आणि खडकवाडी परिसरात विजेचा लपंडाव आणि कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, या समस्येविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी खडकवाडी येथील वीज उपकेंद्रावर शेतकऱ्यांनी तीव्र ठिय्या आंदोलन (The Thiya Movement) केले. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात वीजपुरवठा पूर्ण दाबाने होत नसल्याने आणि लोडशेडिंगचे प्रमाण अनपेक्षितपणे वाढल्याने उभी पिके डोळ्यादेखत जळू लागली आहेत. विशेषतः लागवड केलेला कांदा, टोमॅटो आणि इतर नगदी पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे, ज्याचा परिणाम म्हणून शेतकरी वर्गाने आक्रमक पवित्रा घेतला.
अवश्य वाचा- कत्तलीसाठी चाललेल्या गोवंशीय जनावरांची सुटका; ६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर ओढले ताशेरे (The Thiya Movement)
या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीन रांधवण आणि पळशी गावचे सरपंच प्रकाश राठोड यांनी केले. या परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यास असून त्यांचे संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून आहे. मात्र, खडकवाडी वीज केंद्राकडून मिळणाऱ्या अनियमित पुरवठ्यामुळे या कष्टकरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले. यावेळी डॉ. नितीन रांधवण, प्रकाश राठोड यांच्यासह बाळासाहेब मुसळे, आप्पासाहेब गागरे, दिपक खामकर, ज्ञानेश्वर गागरे, पवन खामकर, पोपट मेंगाळ, नारायण गागरे, रोहिदास देशमुख, वसंत मुसळे, भास्कर गागरे, अजित वाळुंज, सोमनाथ मुसळे, योगेश शिंदे, गोपीनाथ गुंजाळ, बाबाजी वाबळे, भीमराज मुसळे, विकास डुकरे, गोरख इरोळे आणि देविदास वाबळे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आणि तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून, जर त्वरित सुधारणा झाली नाही तर आगामी काळात अधिक तीव्र लढा उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.



