Farmers’ Bhavan : नगर : शेतकरी माल विक्रीसाठी बाजार समितीत आल्यानंतर त्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निवासस्थान मिळावे, या उद्देशाने उभारण्यात आलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन हे शेतकऱ्यांसाठी हक्काचे निवासस्थान ठरेल. शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यास राज्य शासन सर्वोच्च प्राधान्य देत असून अशा लोकाभिमुख विकासकामांना शासनाकडून भविष्यातही आवश्यक सहकार्य दिले जाईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले.
नक्की वाचा : जिल्ह्यात ४ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा
जामखेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या लोकार्पण सोहळ्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेड कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी राम शिंदे बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, पणन संचालक शरद जरे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे, सहाय्यक निबंधक तथा बाजार समिती सचिव दिलीप तिजोरे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की पहा : अन्यायकारक बदली तात्काळ रद्द करा; एसटी कर्मचाऱ्यांचे विभागीय कार्यालयासमोर आंदोलन
गुणवत्ता आणि नियोजन कौतुकास्पद (Farmers’ Bhavan)
राम शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने शेतकरी भवनास प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर अल्पावधीतच दर्जेदार व भव्य इमारत उभारून अनेक वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली आहे. या कामाची गुणवत्ता आणि नियोजन कौतुकास्पद आहे. शेतकरी माल विक्रीसाठी बाजार समितीत आल्यानंतर मुक्कामासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या भवनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून बाजार समित्यांनी केवळ व्यापारापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या सर्वांगीण सुविधांवर भर द्यावा, असेही ते म्हणाले.



