HSRP : महाराष्ट्रातील वाहनधारकांना सतर्क करणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील वाहन सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी आणि गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) बाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्या जुन्या वाहनांना अजूनही उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट बसवलेली नाही, अशा वाहनधारकांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी थेट इशारा दिला आहे.
नक्की वाचा: सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनात घट करणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना एचएसआरपी प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. यापूर्वी यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, अजूनही अनेक वाहनांना ही प्लेट बसवलेली नसल्याने आणि वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, ही शेवटची संधी असून वाहनधारकांनी ३० जून पूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी.
१ जुलैपासून कारवाई (HSRP)
जर तुम्ही ३० जून २०२६ पर्यंत आपल्या वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवली नाही, तर १ जुलैपासून तुम्हाला मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. १ जुलैपासून राज्यभर यासंदर्भात विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून मोटार वाहन कायद्यानुसार १ हजार रुपयांपर्यंत तडजोड शुल्क घेतले जाणार आहे.
अवश्य वाचा: नगरमध्ये अघोरीबाबाचा प्रताप, सोन्यासाठी पाडले घर ;नेमकं प्रकरण काय?
परिवहन मंत्र्यांचे आवाहन काय? (HSRP)
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणालेत की, “राज्यातील सर्व वाहनधारकांनी वाहन सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रक्रिया गांभीर्याने घ्यावी. मुदतवाढीचा लाभ घेत वेळेत HSRP बसवून शासनाला सहकार्य करावे, जेणेकरून दंडात्मक कारवाई टाळता येईल,” असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे,जर तुमच्याकडे २०१९ पूर्वीचे वाहन असेल, तर दंडाची वाट न पाहता आजच आपल्या नंबर प्लेटसाठी नोंदणी करा.
HSRP का आवश्यक आहे?
वाहन चोरी रोखणे आणि बनावट नंबर प्लेट्सचा वापर करून होणारे गुन्हेगारी कृत्य थांबवणे हा या HSRP मागचा मुख्य उद्देश आहे. “केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही यंत्रणा राबवली जात असून, यामुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे,” असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.



