Market for weeks: पाथर्डी: शहरातील दर बुधवारी भरणारा आठवडे बाजार (Market for weeks) रस्त्यावर न भरता वीर सावरकर मैदानावरच भरवण्यात यावा, अशी ठाम मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत नगराध्यक्ष अभय आव्हाड व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शहरातील नाईक पुतळा ते खंडोबा मंदिर परिसर, धामणगाव रोड या मार्गावर दर बुधवारी भाजीपाला विक्रेते, शेतकरी व इतर व्यापारी रस्त्यावरच दुकाने लावून बसत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. या परिसरात रुग्णालये व शाळा असल्यामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना तसेच रुग्णवाहिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अवश्य वाचा- भोसेखिंड प्रकल्पासाठी कायमस्वरूपी आवर्तन उपलब्ध करावे : काकासाहेब तापकीर
मैदानात बसणाऱ्या नियमित व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम (Market for weeks)
वीर सावरकर मैदानात बाजारासाठी मुबलक जागा उपलब्ध असतानाही योग्य नियोजनाअभावी व्यापारी रस्त्यावरच बाजार भरवत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. यामुळे मैदानात बसणाऱ्या नियमित व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत असून ग्राहकांनाही अडचणी निर्माण होत आहेत. यावेळी बाजारकरी शिष्टमंडळाचे समन्वयक मुकुंद लोहिया म्हणाले की, बाजार हा एकाच ठिकाणी बसला पाहिजे. त्यामुळे ग्राहकांना त्रास कमी होईल व रहदारी सुरळीत राहील. बाजारतळ सोडून इतरत्र बाजार भरल्याने सर्वांनाच वेठीस धरले जाते. तसेच पालिका प्रशासनालाही स्वच्छता राखणे कठीण जाते. त्यामुळे प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी.
नक्की वाचा– कर्जतमध्ये शिलाई मशिन घोटाळा; ४३९ महिलांची लाखोंची फसवणूक
मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा (Market for weeks)
मनसे तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनीही प्रशासनावर टीका करत सांगितले की, पालिकेचे नियोजन कमी पडत असल्यामुळेच व्यापारी रस्त्यावर बाजार भरवत आहेत. प्रशासनाने ठोस निर्णय घेत तातडीने बाजार वीर सावरकर मैदानात हलवावा. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.तसेच पावती कर वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा धाक नसल्याने अनेक बाजारकरी नियम मोडत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून रस्त्यावर भरवला जाणारा आठवडे बाजार पूर्णपणे मैदानात स्थलांतरित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, मागणी मान्य न झाल्यास मनसेच्या शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने करबंदी आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी संदीप काकडे यांनी दिला आहे.या वेळी जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, शहराध्यक्ष संदीप काकडे, महिला शहराध्यक्ष रेणुका फुलशेटे, तसेच बाजारकरी शिष्ट मंडळाचे समन्वयक मुकुंद लोहिया,विनोद खटावकर, एकनाथ भंडारी, राहुल कुसळकर, अनिल लाटे, योगेश काकडे, हरीश बाफना, मनोज डोळस, मयूर काकडे, नागेश काकडे, काळे पाटील आदी उपस्थित होते.



