Nagar : नगर : जिल्ह्यातील सर्वधर्मीय सण आणि उत्सव शांततेत साजरे करण्याची आपल्या जिल्ह्याची परंपरा असून मोहरम सणही त्याच शांतता, सौहार्द आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा करून जिल्ह्याची ही परंपरा अबाधित ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात मोहरम सणाच्या अनुषंगाने आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
हेही वाचा : पारनेर तहसील आणि पोलीस ठाणे परिसरात बेशिस्त वाहनांचा विळखा; वाहतुकीचे नियम धाब्यावर
यांची उपस्थिती
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. टिपरसे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुदगेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शांतता समिती सदस्य आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, मोहरम सणादरम्यान मिरवणुकीच्या मार्गांची आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी. मिरवणूक मार्गावरील स्ट्रीट लाईट कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी. तसेच जीर्ण आणि लोंबकळणाऱ्या विद्युत तारांची तातडीने दुरुस्ती करून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने आवश्यक उपाययोजना कराव्यात. उत्सवादरम्यान अखंडित वीजपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी विद्युत विभागाचे विशेष पथक उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
नक्की पहा : वीरगावच्या शेतकऱ्याची दीड एकरातील जांभूळ बागेतून लाखोंची कमाई
आवश्यक सूचना (Nagar)
मिरवणुकांना अडथळा ठरणारे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर व फलक तातडीने हटविण्यात यावेत. तसेच धोकादायक इमारती किंवा इतर संभाव्य जोखमीच्या ठिकाणी आवश्यक ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी. मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय पथके, स्वच्छता सुविधा, फिरती स्वच्छतागृहे तसेच इतर आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या.



