नगर : भारतातील शहरी भागातील तरुणी आणि नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच (यूटीआय) (UTI In Women) आणि योनिमार्गाच्या इन्फेक्शनचे (Vaginal infection) प्रमाण वाढताना दिसतंय. या समस्या आता महिलांमध्ये फक्त एकदाच होत नसून अनेक महिलांना वर्षातून तीन ते चार वेळा या समस्येचा सामना करावा लागतो. डॉक्टरांच्या मते, जगात यूटीआयची सर्वाधिक समस्या भारतात होताना दिसतेय. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा संसर्ग बहुतांशी सुशिक्षित महिलांना अधिक होतो. आता तज्ज्ञ डॉक्टरांनी याची काही कारणे सांगितलेली आहे.
नक्की वाचा : लाडक्या बहिणींना मे महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार?
कारणे नेमकी कोणती? (UTI In Women)
१.ऑफिसमधील घाणेरडे वॉशरूम आणि वाढलेले कामाचे तास
शहरी जीवनशैलीमुळे महिलांना ऑफिसमध्ये बराच वेळ काम करावं लागतं. अनेकदा स्वच्छ शौचालयांच्या अभावामुळे त्या बराच वेळ लघवी रोखून धरतात. डॉक्टरांच्या मते, लघवी रोखून धरल्यामुळे किडनीत बॅक्टेरियांची वाढ होते, ज्यामुळे इन्फेक्शन होतं. इतकेच नाही तर चुकीच्या पद्धतीने स्वच्छता करणं किंवा केमिकल्स, सुगंधी प्रोडक्ट्स वापरणं यांसारख्या पर्सनल हायजीन मधील चुकांमुळे योनीतील नैसर्गिक बॅक्टेरिया म्हणजेच चांगले जीवाणू नष्ट होऊ शकतात. यामुळे महिलांना इन्फेक्शनचा धोका दुप्पट होतो.
२. स्वतःच औषधं घेणं
जेव्हा महिलांना लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात त्यावेळी त्या डॉक्टरांकडे जाण्याऐवजी मेडिकल स्टोअरमधून अँटीबायोटिक्स विकत घेऊन स्वतःच त्यांचं सेवन करतात. थोडा आराम मिळाला की, त्या औषधोपचाराचा कोर्स सोडून देतात. अनेकदा आपल्याला कळत नाही, मात्र ही सवय आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असते. औषधोपचाराचा कोर्स अपूर्ण सोडल्यामुळे बॅक्टेरिया पूर्णपणे नष्ट होत नाहीत आणि शरीरात अँटीबायोटिक प्रतिरोध निर्माण होतो. याचा अर्थ असा की, पुढच्या वेळी औषध घेतल्यावर इन्फेक्शन परत येतं आणि औषध काम करणं थांबवतं.
अवश्य वाचा : कर्जमाफी जाहीर पण कोणते शेतकरी पात्र ठरणार? ‘एकवेळ समझोता’ नेमकं काय?
३. चुकीच्या कपड्यांची निवड (UTI In Women)

महिलांची फॅशन आणि कपड्यांची निवड देखील या आजाराला सध्या कारणीभूत ठरतंय. सतत घट्ट सिंथेटिक कपडे किंवा जीन्स घातल्याने प्रायव्हेट पार्टना हवेचं सर्क्युलेशन थांबतं. ज्यामुळे ओलावा वाढतो. हा ओलावा बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीसाठी पोषक वातावरण ठरतो. ऑफिसमध्ये आणि घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या महिलांना बऱ्याच प्रमाणात ताण-तणावाचा सामना करावा लागतो. अतिरिक्त तणावामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे महिलांमध्ये इन्फेक्शनशी लढण्याची शक्यता कमी होते.
अशी कारणे तज्ञ डॉक्टरांनी सांगितलेली आहेत. मात्र तुम्हालाही असा काही त्रास होत असेल तर तुम्ही हि गोष्ट नजरेआड टाकू नका आणि त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.



