Sampat Baraskar : नगर : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हा अमूल्य संदेश देत वृक्षांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविले. मानव, निसर्ग आणि पर्यावरण यांच्यातील अतूट नाते अधोरेखित करणारा हा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरत आहे. वाढते प्रदूषण, कमी होत चाललेले हरित क्षेत्र, बदलते ऋतुमान आणि वाढते तापमान यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होताना दिसत आहे.
नक्की वाचा : इतिहास जगलेला आवलिया भूषण देशमुख
‘एक कुटुंब – एक झाड’ संकल्प
याच पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवत ‘एक कुटुंब – एक झाड’ हा संकल्प साकारण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांना मोफत फळझाडे आणि देसी वृक्षांचे वाटप केले जाणार आहे. या माध्यमातून हरित अहिल्यानगर घडविण्याचा संकल्प करण्यात आल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आमदार जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण (Sampat Baraskar)
आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त तपोवन रोड येथील लक्ष्मीनगर परिसरात वृक्षारोपण करून हरित अहिल्यानगर संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस गणेश बोरुडे, दिनेश खेडकर, दीपक गायकवाड, पारस गायकवाड, प्रदीप कारले, प्रदीप बोराडे, हरिभाऊ रायकर, गणेश मरकड, योगेश माळी, जपे मेजर, म्हस्के मेजर, महेश डुकळे, कुलदीप केंद्रे, अंबादास जिदम, दत्ता दातीर, संतोष कोठारी, संजय पादीर, देविदास ससे, संतोष रच्चा, रेववनाथ सोमवंशी, सत्यप्रेम गिरी, भाऊसाहेब सांगळे, विठ्ठल गांगर्डे, देवा ब्राह्मणकर, गणेश केदारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना संपत बारस्कर म्हणाले की, (Sampat Baraskar)
“पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ वृक्ष लावण्यापुरता कार्यक्रम न ठेवता प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, यासाठी जनजागृती केली जात आहे. “शहरातील प्रत्येक भाग हरित व्हावा, प्रत्येक कुटुंबाचा निसर्गाशी संबंध निर्माण व्हावा आणि पुढील पिढ्यांना स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पर्यावरण मिळावे, या उद्देशाने मोफत फळझाडे व देसी वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. हरित अहिल्यानगर ही केवळ संकल्पना नसून ती लोकसहभागातून साकार होणारी चळवळ आहे.
यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, “प्रभागातील विकासकामांबरोबरच सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपत पर्यावरण संवर्धनासाठी देखील सातत्याने काम केले जात आहे. संपत बारस्कर यांनी गेल्या दहा वर्षांपासून वृक्षारोपण आणि संवर्धनाची लोकचळवळ उभी केली आहे. प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली असून नागरिकांनाही या अभियानात सहभागी करून घेण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले की, “आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक कुटुंब – एक झाड’ हा संकल्प अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून हरित अहिल्यानगर निर्माण करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग घेत लोकचळवळ उभी केली जाईल.
यावेळी लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “मागील वर्षी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते. त्या वेळी लावण्यात आलेली झाडे आज मोठी झाली असून त्यांची चांगली वाढ झाली आहे. वृक्षसंवर्धनावर दिलेला भर आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळेच हे शक्य झाले आहे.
कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीच्या माध्यमातून हरित, स्वच्छ आणि सुंदर अहिल्यानगर घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. ‘एक कुटुंब – एक झाड’ या संकल्पनेतून प्रत्येक घर निसर्गाशी जोडले जाईल आणि ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हा संतांचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



