नगर : राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीतुन माघारी घेतल्यावर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज (ता.२०) सोमवारी राहुरीत येणार आहेत. या कार्यक्रमात प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) भाजपचे कमळ हातात घेतील,अशी चर्चा आहे. याविषयी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी आपल्याला तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
नक्की वाचा: मंत्रालयात आता कार्यकर्त्यांची गर्दी चालणार नाही; नवे नियम कोणते?
‘ते मला तसं काही बोललेले नाहीत’ (Supriya Sule On Prajakt Tanpure )
सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या की, मी प्राजक्त तनपुरे यांच्याशी अनेकदा बोललेली आहे. गेल्याच आठवड्यात आमचं बोलणं झालं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं की, ते आता निवडणूक लढू इच्छित नाहीत. त्यांची कार्यकर्त्यांशी चर्चा झाली आहे. मात्र पुढे आपण एकत्र काम करत राहू, असे ते गेल्याच आठवड्यात मला म्हणाले होते. माझ्या माहितीप्रमाणे प्राजक्त तनपुरे यावेळी विधानसभा लढणार नाहीत. ते कुटुंबासोबत कुठेतरी सुट्टीला जाणार होते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
प्राजक्त तनपुरे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, शक्य असेल. पण ते मला तसं काही बोललेले नाहीत. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे, अशी टिप्पणी सुळे यांनी केली.
‘तत्त्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचं राजकारण संपलं’
माझ्यासोबत पक्षात असणारे तिघेजण राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले, तिकडे त्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाले. मात्र, दुसरीकडे आमच्यासारखे निष्ठा ठेवणाऱ्या राजकारण्यांचे राजकारण संपत चालले आहे याचे दुःख होते,अशी भावना प्राजक्त तनपुरे यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली. ते म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव आला होता. पण मला निष्ठा, तत्व याच्याशी प्रामाणिक राहावं असे वाटले. पण सध्याचे राजकारण म्हणजे जो तत्वाशी जोडलेला राहिल त्याचे राजकारण संपत आहे, याउलट जे तत्त्वांशी तडजोड करतात ते सत्तेत मोठ्या पदावरती जातात अशी स्थिती आहे, अशी खंत प्राजक्त तनपुरे यांनी अलीकडेच बोलून दाखवली होती. त्यामुळे त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.



