Tree Plantation : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे वृक्षारोपण

वृक्षारोपणाची व्यापक लोकचळवळ उभी करण्यात आली

0
Tree Plantation : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे वृक्षारोपण
Tree Plantation : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे वृक्षारोपण

Tree Plantation : नगर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भिस्तबाग-महाल तलाठी कार्यालय रस्त्याच्या बाजूने वृक्षारोपण (Tree Plantation) कार्यक्रम उत्साहात झाला. पर्यावरण संतुलन, स्वच्छता आणि हरित विकासाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध मान्यवर आणि नागरिकांनी सहभाग घेत वृक्षसंवर्धनाची (Tree Conservation) सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला.

नक्की वाचा : ‘जलसंपदा’चे कार्यालय नगरमधून हलविण्यास विरोध; खासदार लंके यांचा आंदोलनाचा इशारा

Tree Plantation : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे वृक्षारोपण
Tree Plantation : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे वृक्षारोपण

वृक्षारोपणाची व्यापक लोकचळवळ उभी करण्यात आली

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले की, प्रभागाच्या विकासाच्या योजनांबरोबरच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाची व्यापक लोकचळवळ उभी करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून नागरिकांमध्ये वृक्षांचे महत्त्व रुजावे यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर नागरिकांना मोफत दहा ते पंधरा फूट उंचीची आंब्याची रोपे उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे आज कॉलनी अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा आंब्याची भरघोस झाडे दिसून येत असून या परिसराची ओळखच ‘आंब्यांच्या झाडांचा प्रभाग’ अशी निर्माण झाली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पुढील पाच वर्षे अधिक जोमाने काम करण्यात येणार (Tree Plantation)

ते पुढे म्हणाले की, प्रभागातील डीपी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना विविध देशी वृक्षांची लागवड करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. कोरोना काळात प्रत्येकाला वृक्षांचे खरे महत्त्व जाणवले. वृक्ष आपल्याला २४ तास मोफत प्राणवायू देतात, वातावरण शुद्ध ठेवतात आणि पर्यावरण संतुलित राखण्यास मदत करतात. त्यामुळे वृक्षारोपण ही केवळ एक मोहीम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी दिलेली अमूल्य भेट आहे. स्वच्छ, सुंदर आणि हरित प्रभाग निर्माण करण्यासाठी पुढील पाच वर्षे अधिक जोमाने काम करण्यात येणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

वृक्षारोपण ही काळाची गरज

नगरसेवक डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, प्रभागाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही तितकेच महत्त्व दिले जात आहे. संपत बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे काम सातत्याने राबविले जात आहे. केवळ झाडे लावणे नव्हे तर ती जगविणे आणि वाढविणे ही खरी जबाबदारी असल्याने दरवर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन केले जाते. त्यासाठी स्वतंत्र पाणी टँकरची व्यवस्था करण्यात आली असून नियमित पाणीपुरवठा करून वृक्षांचे संवर्धन केले जात आहे. वाढते तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरणीय संकटे लक्षात घेता वृक्षारोपण ही काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश

मंडळ अधिकारी शैलजा देवकाते यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देत वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली तर पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल, असे त्यांनी नमूद केले. या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत नागरिकांमध्ये वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. भविष्यातही अशाच लोकसहभागातून हरित आणि पर्यावरणपूरक अहिल्यानगर घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी मंडळ अधिकारी शैलजा देवकाते यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, ग्राम महसूल अधिकारी सतीश तासतोंडे, कुणाल काळे, सुरेश तागड, मनोहर कनोरे, संदीप गोसावी, शरद गुंड, गणेश बोरुडे, दिनेश खेडकर, सचिन चितळकर आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.